काही महिन्यांपूर्वी आकाशवाणी पुणे केंद्रावर भारती ठाकूर आल्या होत्या. हो, भारती ठाकूर त्याच ज्यांनी २००५ मध्ये आपल्या तीन मैत्रिणींसोबत नर्मदा परिक्रमा करताना मध्यप्रदेश येथील अनेक गावे जवळून बघितली. आजूबाजूची निसर्ग नवलाई न्याहाळताना, तिथल्या हजारो वर्षांची परंपरा असलेली नर्मदा खोऱ्यातील संस्कृती जवळून अनुभवली. वैविध्यपूर्ण अशी जैविक संपदा धरणांच्या पाण्याखाली जाण्याआधी एकदा डोळे भरून पाहून घ्यावी यासाठी सुरु झालेली ‘ नर्मदा परिक्रमा ‘ त्यांना एका वेगळ्या वाटेची वाटसरू करून गेली.
                                             
त्या वेळी नर्मदेच्या किनाऱ्यावरील वस्त्या-वस्त्यांमधून जात असताना, तिथल्या ग्रामवासीयांबरोबर संवाद साधताना, त्यांचं जगणं जवळून पाहताना, समजून घेताना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली, ती म्हणजे आजूबाजूला दिसणारी ही समृद्धी गावकऱ्यांच्या प्रत्यक्ष जीवनात आलेली नाही. तिथे असणाऱ्या जमीनी मूठभर लोकांच्या मालकीच्या आहेत आणि त्यावर मजुरी करणाऱ्यांचे  किंवा अल्प भूधारकांचे  प्रमाण मात्र प्रचंड आहे. त्यातही कापूस आणि मिरची तोडण्यासाठी बालमजुरांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. महेश्वर तालुक्यातील मंडलेश्वर गावाजवळ होत असलेल्या श्रीमहेश्वर वीजनिर्मिती प्रकल्पामुळे २२ गावे या धरणाच्या डूब क्षेत्रात येतात. काही गावात विस्थापितांसाठी काम सुरु आहे,पण त्याचा आवाका कमी आणि कामाची गती तर त्याहून कमी. प्रवासात एका ठिकाणी भारती ठाकूर अचानक आजारी पडल्या,ज्या ठिकाणी उपचार करण्यासाठी क्षणभर थांबल्या, तिथे काही लहान मुलांबरोबर गप्पा मारू लागल्या. बोलता-बोलता त्यांच्या असं लक्षात आलं की ही मुलं शाळेत तर जातात पण त्यांना साधे स्वतःचे नावही लिहिता येत नाही. मुळातच सामाजिक भान असणारी ही शिक्षिकरुपी लेखिका, अस्वस्थ झाली आणि मग काय?  नंतर तिथेच राहून तिथल्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी करायचे  यासाठी त्यांनी २५ वर्षांच्या केंद्र सरकारच्या नोकरीवर त्यांनी पाणी सोडलं आणि थेट नाशिक सोडून नर्मदा माईच्या कुशीतल्या ‘लेपा ‘ गावात स्वःच्या कामाची सुरुवात केली. आणि तिथून मग भारती ताईंच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली.

२००९ ला भारती ताईंनी ‘ नर्मदालय ‘ सुरु केलं. याआधी विवेकानंद केंद्राच्या वतीने आसाममध्ये शाळा सुरू करण्याचा अनुभव यांच्या गाठीशी होता. तिथल्या ‘गोलाघाट’ गावात शाळा सुरू करण्याच्या प्रकल्पाची पूर्ण उभारणी करण्यासाठी त्या तिथे ४ वर्ष बिनपगारी रजेवर राहिल्या. शिवाय नाशिकमध्ये २० वर्षे झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्याचा अनुभवही गाठीशी होताच. त्यासर्वांचा मेळ घालत ‘ लेपा ‘ इथे १७ ऑगस्टला २००९ ला १४ मुलांच्या उपस्थितीत अभ्यासवर्ग सुरु झाला. शाळा यासाठी नाही म्हणणार कारण त्याच स्वरूप होतच तसं. अनौपचारिक पद्धतीने गाणी, गप्पा-गोष्टींच्या मदतीने आधी या मुलांना आपलसं करण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. नंतर हळूहळू त्यांना उपयोगी आणि गरजेच्या विषयांची निवड करत नेहमीप्रमाणे पाठ्यपुस्तिकीय अभ्यासक्रमाऐवजी त्यांच्या गरजांना, त्यांच्या आवडीला लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करण्यात आला. त्यामुळेच नर्मदालयात क्रमिक पुस्तकं नाहीत. इंग्रजी, गणित, हिंदी व पर्यावरण हे विषय मुलांना ‘ नर्मदालयाने ‘ तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार शिकवले जातात. इथे येणाऱ्या मुलांकडे तीन तासांहून जास्त वेळ नाही. त्यामुळे इच्छा असूनही इतर विषय शिकवता येत नाहीत. अनेक विषय तर नर्मदेच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात शिकवले जातात. नर्मदालयाची वेळ सकाळी साडेसात ते दहा. त्यानंतर मुलं शेतात किंवा अन्य कामावर जातात. काम नसेल तेव्हा तिथल्या सरकारी शाळेत जातात. नर्मदालयात येण्यासाठी  ७ ते १४ वयोगटातील मुली पहाटे साडेचार- पावणे पाचला उठतात. चुल पेटवून घरातील सगळ्यांचा स्वयंपाक करून ठेवतात आणि मग ३ ते ४ मैल चालत नर्मदालयात येतात. शिकण्यासाठीची त्यांची जिद्द खरंच वाखाण्याजोगीच आहे.

शिक्षणच नाही तर एकंदर सर्वच घटकांवर भारती ताईंना काम करावे लागले. पुरुषांची व्यसनाधीनता, आरोग्यविषयक उदासीनता, मूठभर लोकांची आपली हुकूमशाही हातून सुटू नये यासाठीची धडपड आणि त्यासाठी भारती ताईंच्या कामाला झालेला विरोध. परंतु या सर्वांवर मात करत भारती ताईंनी स्वतःचे काम सुरूच ठेवले, आणि त्याचेच फलित असेल कदाचित की आता नर्मदालयाचा पसारा वाढून  तो आता लेपा, आमलाथा, नहारखेडी, ससाबड, भग्यापूर, नगावा, मोगावा, टिग्रीयॉव अशा आठ खेडय़ांतील आणि सुमारे ८५० मुलांपर्यंत वाढलाय. २७ शिक्षकांची फौज आता नर्मदा माईच्या लेकरासाठी नवी वाट तयार करण्यात गर्क आहे. भारती ताई म्हणतात,” जितका विरोध अनुभवला त्यापेक्षा जास्त पटीने लोकांची मदत अनुभवली. अभ्यासवर्ग सुरु असताना अचानक एक संन्यस्थ व्यक्ती येते काय?, स्वतःचे आश्रम शाळेसाठी दान करते काय? काही दिवसातच मूंबईतून आर्थिक मदतीचा हात येतो काय? आणि बघता-बघता नर्मदालयाचा वटवृक्ष स्वतःच्या पारंब्या सगळेकडे पसरवत दिमाखात उभा राह्तो काय? सगळेच कसे स्वप्नवत. पण खरं सांगायचं तर हे असं स्वप्न आहे जे प्रत्यक्ष आकार घ्यावे यासाठी भारती ठाकूर यांची जिद्द, चिकाटी, कामाविषयीची आस्था,धैर्य, सहनशीलता आणि महत्वाचे म्हणजे निस्वार्थी भावना कारणीभूत ठरली.

भारती ताईंचे अनुभव त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकताना अंगावर शहारा येत होता. पण आता थोडं शांत झाल्यावर जेव्हा विचारचक्र सुरूच राहत तेव्हा  कुणीतरी अचानक डोळ्यावरची पट्टी काढून वास्तवाची जाणीव करून दिल्यासारखं वाटत, आणि असा हा प्रयत्न कोणीतरी पहिल्यांदाच केलाय असाही नाही. १९३२ – ३३ मधेही पदमभूषण ताराबाई मोडक यांनीही केलाच की, १९३३ पासून मराठीत ताराबाईंनी शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. त्यामधून वेळोवेळी त्यांनी शिक्षण, शिक्षक, शिक्षणपद्धती विद्यार्थी, सामाजिक भौगोलिक समाज त्यांच्या मान्यता त्या बदलण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपली कर्तव्ये यावर विस्तृत लेखन केलं आहे. आपल्या १९६९ च्या शिक्षणपत्रिकेच्या एका अंकात ताराबाईंनी आदिवासी शिक्षण- प्रशिक्षण समस्या यावर लेख लिहलाय.  त्यात त्या म्हणतात मागास भागात शिक्षक शिकविण्यासाठी येण्यास उत्सुक नसतात आठवड्यातून दोन चार वेळाच येतात कधी कधी येतात शाळा उघडून पुन्हा आपल्या इतर कामांसाठी निघून जातात, तर कधी शाळा एखाद्या मोठ्या मुलांच्या ताब्यात देऊन आपल्या उधारी वसूल, कर्ज देणे ,व्याज गोळा करणे अशा वेगवेगळ्या उद्योगासाठी बाहेर पडतात, अवचित शाळा तपासणीसाठी कोणी आलं तर आताच बाहेर गेलेत असं सांगण्यात येतं,  मग मागून कोणीतरी त्या शिक्षकांना बोलावून आणते.  ग्रामीण विशेषतः मागास भागात मुलांच्या शिक्षणाची परवड शिक्षकाकडून होते. याशिवाय रुजू झाल्यापासून हे शिक्षक नाराज असतात अनेक कारणे देत आपली बदली शहरात करून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. अनेकदा शासनही शिक्षा म्हणून किंवा मग नावडत्या शिक्षकांची बदली अशा भागात करतात ( अर्थात हा छुपा आरोप आहे शासनावर खरे खोटे माहित नाही ) पण मागास भागात बदली म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षाच मानण्यात येते. याच लेखात ताराबाई शिक्षकांची मानसिकता समजून घ्यायला हवी यावर भाष्य करतात.

पण मला प्रश्न पडतो की १९ च्या काळात ताराबाईंनी जे सांगितलं ते आजही ” जेसे थे ” याच स्थितीत आजही आहे. विद्यार्थी काय? किंवा शिक्षक काय? अनेक ठिकाणी परिस्थिती तशीच आहे. एकीकडे आपण सगळेच जण आपल्याकडे सगळंच कसं सुरळीत योग्य  सुरु आहे असं मानतोय किंवा दाखवतोय. नव्या जगाची कास धरत डिजिटल शिक्षणाच्या गप्पा मारणारे आपण, ग्लोबल विचारांचे पुरस्कर्ते आधुनिक शिक्षणाचे नवेनवे आयाम शोधणारे आपण सर्वच जण कधी भानावर येणार की आपल्याकडे आजही मागास,  आदिवासी शिक्षण क्षेत्रातील अडचणी अजूनही तशाच आहेत. १९ च्या काळात ताराबाईसारखी किंवा अनुताई सारखी मुलाविषयी खऱ्या अर्थाने कळवळा वाटणारी शिक्षिका, समाजसेविका प्रयत्नपूर्वक काहीतरी जीव तोडून करणार नंतर काय तर २००९ ला कोणी भारती ठाकूर असंच काहीसं करण्यासाठी धडपडणार!…..  पण मुद्दा हा आहे की कोणीतरी दुसऱ्याने आपल्या डोळ्यात अंजन घातल्याशिवाय आपण सुधारणारच नाही का? का वेळोवेळी फक्त सुधारण्याचा आभास निर्माण करत राहणार, असं म्हणतात की ‘ जो इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही ‘ पण १९ च्या काळात ताराबाईंचा इतिहास आपण विसरलोच न म्हणूनच तर  मध्यप्रदेशात जवळजवळ ९० वर्षांनी भारती ताईंना सुद्धा मुलाच्या आरोग्यापासून त्यांना शिक्षणासारखा महत्वाचा हक्क मिळून देण्यासाठी याकाळात लढावं लागलं. मी काही डिजिटल शिक्षण किंवा मग  इतर शिक्षणातील क्रांतिकारक बदल याबाबत नकारात्मक नाही पण मूलभूत शिक्षणच उपलब्ध नसलेली अनेक मागास भाग आपल्याकडे असताना online शिक्षण पद्धतीचा गाजावाजा वाढविण्या आधी आपण या सगळ्यांना आधी प्रवाहात कसं आणता येईल याकडे लक्ष केंद्रित करायला हवं असं वाटत आणि अर्थातच ही सुरुवात शासन पातळीवर जितकी हवी तितकी अध्यापक विद्यालय मधूनही व्हायला हवी. आपण सगळेच काही या दिग्गजांसारखे स्वतःला वाहून देऊन काम करण्याचा पिंड घेऊन नाही जन्मलो किंवा वाढलो,  पण तरीही आपल्या शिक्षक सेवेतील जी काही किमान तीन वर्ष तरी आपण अशा मागास भागात काढणार ती आपल्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा न वाटता नवं काहीतरी घडवण्याचा काळ किंवा नवक्रांतीची संधी जी त्यानंतर कधीच मिळणार नाही अशी भावना निर्माण करणारी ठरेल अशी असावी असं वाटतं. आणि त्यासाठी अध्यापक विद्यालयांमध्ये जसे शिक्षक घडविण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम आहे तसेच काहीसा त्या शिक्षकांमध्ये आदिवासी मागास भागात काम करण्यासाठी जाण्यातील सकारात्मकता वाढवणारे काही करता येईल का यावर विचार व्हावा असं वाटत. कारण शेवटी तो शिक्षकांच्या मानसिकतेचा भाग आहे आणि ती मानसिकता आपण ते शिक्षक म्हणून घडतानाचा त्यांच्यामध्ये रुजवू शकतो नाही का?……

हे सगळं यासाठी वाटत की ताराबाई असो किंवा अनुताई असो किंवा मग अगदी भारती ताई असो पण या सगळ्या त्यांच्या त्यांच्या कालखंडात काम करतील आपल्याला काहीतरी नवं शिकवू पाहतील पण तो वारसा पुढे पुढे नेण्यासाठी जर प्रत्येकवेळी आपण ९०-९० वर्षाची दरी निर्माण करत राहिलो तर त्या त्या कालखंडातील आदिवासी, मागास भागातील विद्यार्थ्यांचे काय ?पर्यायाने आपल्या नव्या पिढींचे काय? आणि सरते शेवटी आपल्या भारताचे काय?……हे  प्रश्न निरुत्तरितच राहतात नाही का? कारण शेवटी “वंचितांचे शिक्षण प्रगतीचे लक्षण ” हेच खरे! ……. त्या वंचितांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी ठोस पावले आपण कधी उचलू तेव्हा ही ९०-९० वर्षांची दरी निर्माण होणार नाही,  नाही का?……

वैशाली जाधव
शिक्षणपत्रिका समिती सदस्या