27 सप्टेंबर ला त्यांचे देहावसान झाले. त्याची आठवण म्हणुन आज हा लेख लिहीला आहे.
त्यांच्या विषयी थोडक्यात लिहायचे म्हणले तरी पुस्तकाचे समीक्षण केल्यासारखे आहे. त्यांचे कार्य फारच मोठे आहे. आत्ताच्या काळात त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी किती कष्ट घेतले याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. त्याच्याविषयी लिहीताना कुठून व कशी सुरवात करावी , काय लिहावे हा प्रश्न पडला आहे.
“पद्मश्री” पारितोषिकाच्या मानकरी अनुताई वाघ सगळ्यांना परिचयाच्या आहेत. परंतू सुरवातीच्या काळात त्यांचा आदिवासी भागात काम करतानाचा खडतर प्रवास आपल्याला माहीत नाही. ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे हे समाजात रुढ नव्हते, त्या काळात त्यांनी प्रवाहाविरुध्द जाऊन शिक्षण घेतले. नोकरी केली, समाजकार्य केले… हे त्यांचे वेगळेपण निश्चित वैशिष्ट्यपूर्ण होते.
त्यांचा जीवनप्रवास थोडक्यात लिहायचा तर त्यांच्या जन्मापासून त्यांच्या उत्तुंग कार्यक्षेत्राच्या “कोसबाडच्या टेकडीपर्यंत” पोचायला हवे.
10 मार्च 1910 साली मोरगाव येथे वाघ कुटुंबात अनुताईंचा जन्म झाला.
त्या काळातील प्रथेनुसार त्यांचा बालविवाह झाला, परंतू सासरी जाण्यापूर्वीच त्यांना वैधव्य आले. त्यामुळे त्या कायम अनुताई वाघ राहील्या.
त्यांना शिक्षणाची आवड होती व आईवडिलांनी पण प्रोत्साहन दिले, त्यांना शिकवले. मुळात हुषार असणाऱ्या अनुताई मनापासुन शिकल्या. B.A. झाल्या. पुढेही त्या सतत नवे काहीतरी शिकतच राहील्या.
1925 साली व्हर्नाक्युलर फायनल परिक्षेत प्रथम क्रमांकाने पास झाल्या. 1926 साली पुण्यात ट्रेनिंग काॅलेजमधे प्रवेश घेतला. 3 वर्षाचे ट्रेनिंग घेऊन पी.टी.सी. परिक्षेतही त्या पहील्या आल्या. 1930 साली चांदवड एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणुन नोकरीला लागल्या. 1933 साली पुण्याच्या हुजुरपागा शाळेत नोकरी करु लागल्या. तेथे त्यांनी 13 वर्ष काम केले.
याच काळात त्या शिक्षण पत्रिका या मासिकात मधुमक्षिका या नावाने लेखन करु लागल्या.
या मासिकाच्या रुपाने ताराबाई मोडक ह्या त्यांच्या आयुष्यात आल्या.
याच काळात त्यांनी मॅट्रिकची परिक्षा दिली व त्या उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाल्या. दिवसभर नोकरी करून नाईट स्कुलमधे शिकुन त्या मॅट्रिक झाल्या. त्यानंतर 51 व्या वर्षी त्या B.A. झाल्या.
त्यांच्या या शैक्षणिक प्रवासा बरोबर त्यांचे कामही जोरात चालू होते.
1945 साली बोरीवली येथे ‘अखिल भारतीय ‘ स्वरुपाचे एक शिबीर होते. कस्तुरबा राष्ट्रीय निधी मार्फत महिला व बालसेवेची कामे सुरू करण्यासाठी प्रत्येक राज्यात अध्यापन केंद्र निघणार होती. त्याची पूर्वतयारी म्हणुन बोरीवलीचे शिबीर होते. अनुताईंनी मोठ्या प्रयत्नाने तेथे प्रवेश मिळवला व पुण्यातील हुजुरबागा शाळेतील नोकरी सोडून दिली.
त्यांचा हा निर्णय त्यांच्या पुढील कार्याच्या शुभारंभानिमित्त पायाच म्हणावा लागेल. कारण तेथेच त्यांची ताराबाई मोडक यांची भेट झाली आणी त्यांच्या जीवनप्रवाहास वेगळे वळण लागले .
‘बोर्डी’ येथील नूतन बाल शिक्षण संघातर्फे बालवाडी चालवण्याचे काम त्यांनी स्विकारले.
₹45 महीना पगारावर त्या तेथे काम करू लागल्या. बोर्डीच्या बाहेरची दरजीवाडी येथे अनुताईअंनी पहिली बालवाडी चालवली. हेच विकासवाडीचे जन्मस्थळ म्हणायला पाहीजे. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहीलेच नाही. वेगवेगळ्या प्रकल्पावर त्या काम करत गेल्या.
‘वाघ’ नावाला साजेसे, वाघासारखेच काम त्यांनी केले असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
बोर्डीचे हे कार्य पुढे ‘कोसबाडच्या टेकडीवर’ प्रस्थापित झाले. तीच त्यांची कर्मभूमी झाली.
1945 ते 1973 या काळात त्यांनी ताराबाईंच्या बरोबरीने आदिवासींसाठी काम केले. 1973 मधे ताराबाईंच्या निधनानंतर अनुताई संस्थेच्या संचालिका झाल्या. पुढे 1992 पर्यंत ही धुरा त्यांनी उत्तम रितीने सांभाळली. अनेक नवनवीन प्रयोग केले. त्या खुप मानाचे आयुष्य जगल्या. त्यांच्या सर्व पारितोषिकांची यादी येथे देणे अवघड आहे. तो एका मोठ्या लेखाचा विषय आहे.
ताराबाई व गिजूभाई बधेका हे त्यांना गुरुस्थानी होते. त्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या अनुताईंनी त्यांच्याच वाटेवर खुप उत्तम काम केले.
बालवाडी, आंगणवाडी, विकासवाडी, कुरणशाळा, रानशाळा, उद्योगपर्व, कार्यानुभव प्रकल्प असे एकापेक्षा एक उत्तम प्रकल्प अनुताईंनी केले.
प्रतिकूल व अनुकूल परिस्थितीप्रमाणे त्या सतत काम करत होत्या. जिद्द व अथक परिश्रमांमुळे त्यांनी संस्थेला मोठे केले.
शिक्षणाने विकास होईल हे या आदिवासी अशिक्षित लोकांना पटवणे हे अतिशय अवघड काम होते. विद्यार्थी गोळा करणे हे मोठे आव्हान होते. निरनिराळ्या कल्पना लढवून त्यांनी कौशल्याने विद्यार्थी गोळा केले.
सुरवातीला मुले शाळेत येत नसत , तेव्हा आपण त्यांच्या अंगणात जाऊन शिकवू या भूमिकेतून ‘अंगणवाडी‘ सुरू केली. माळरानावर गुरे घेऊन जाणाऱ्या मुलांसाठी ‘कुरणशाळा’ केली. तिथे म्हशींच्या पाठीवर अक्षरे गिरवली जायची. झाडांची पाने मोजून गणित शिकवले जात असे.
मजुरीवर जाणाऱ्या मुलांना शाळेत आणण्यासाठी ‘उद्योगाला’ चालू केले. तेथे मुलांना काम व मोबदला ही मिळत असे. आधी शाळा, नंतर काम असे या शाळेचे स्वरूप होते. कामासाठी लागणारी कौशल्ये सुतारकाम, शेतीकाम, शिवणकाम, विणकाम हे पण शिकवले जात असे. प्रत्येक आलेल्या अडचणीतून असे वेगवेगळे मार्ग काढत , नव्या कल्पना राबवत त्यांचे कार्य पुढे जात राहीले.
हरिजन वस्तीवरील मुले शाळेत आल्यावर त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी अनुताईंनी उचलली होती.
मुलींच्या वेण्या-फण्या करणे, उवांचे औषध लावणे, आंघोळी घालणे, कपडे धुणे या सर्व गोष्टींची सोय त्यांनी संस्थेत केली होती. ज्या लोकांबरोबर काम करायचे त्यांच्यामधे पुर्णपणे मिसळून अनुताई काम करत होत्या. सहाजिकच यामुळे हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत होती. 7/8 वर्षांच्या या अथक परिश्रमाने यश आले व विद्यार्थी गळतीचे प्रमाण खुप कमी झाले. या कालावधीतील अनुताईंचे अनुभव विलक्षण आहेत.
72 व्या वर्षी त्यांनी एक नवा प्रयोग केला. मुकबधीर मुलांसाठी शाळा व वसतीगृहात सुरू केले.
75 व्या वर्षी ‘ग्राममंगल‘ हा प्रकल्प हाती घेतला. त्यासाठी नवी पुस्तके तयार केली. मुक्त प्राथमिक शाळेच्या स्वरुपात ही एक प्रयोगशाळाच होती.
सामाजिक जाणिवेतून अनुताईंनी ‘सावीत्री’ मासिकाचे कार्य चालू केले. उत्तम कौशल्यपूर्ण कामे केलेल्या उपेक्षित भगीनींच्या जीवनकथा त्यांनी या मासिकातून पुढे आणल्या.
खेडेगावात महिलामंडळ कशी चालवावी हे दाखवणारे एक सदर ‘सावित्री’ मासिकात येत असे. ते नंतर पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले.
‘सहज शिक्षण’ ही पुस्तिका त्यांनी लिहीली. वडाच्या पारावर, आजीबाई चा बटवा, शिवबाच्या मळ्यात अशा शीर्षकाखाली रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन त्या शिकवत असत.
खताचा वापर, बाजारातील हिशोब यासारख्या गोष्टी पण सहज शिक्षण पुस्तकातून मिळत होत्या .
1973 ला अनुताईंनी एक मुद्रणालय चालू केले. सोप्या भाषेतील 25 पुस्तके तेथे छापली.
शिक्षण पत्रिका हे मासिक ही येथेच छापले जात होते.
1976 मधे ‘प्रबोधनकार’ ही महीला मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली.
‘शबरी उद्योगालय’ या योजनेत तिखट, हळद, मसाले, पापड करुन मुंबई मधे विक्रीला पाठवण्यात येत होते.
खेडेगावात काम करणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग कोसबाडला घेतले जात होते. ‘कोसबाड ग्राम बाल सेविका विद्यालय’ हे संपूर्ण भारतात एकमेव होते.
युनिसेफच्या मदतीने ‘सकस आहार प्रशिक्षण योजना’ चालू केली होती. त्याचे एक केंद्र कोसबाडला देण्यात आले. दहा गावात हिंडुन महिलांना सकस आहार, बाल संगोपन, बाल आरोग्य, परसबाग यासंबंधी शिक्षित करण्याचा हा उद्बोधक कार्यक्रम अनुताईंनी सुरू केला.
अनेक पुस्तकांपैकी ‘बालवाडी कशी चालवावी‘ हे पुस्तक खूप गाजले. त्याचा इंग्रजी, हिंदी व गुजराथी मधे अनुवाद झाला आहे.
वारली भाषेचा अभ्यास करुन मराठीला संलग्न शब्द वापरुन मुलांना शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. वारली व मराठी अशी डिक्शनरी बनविण्याचे काम अजूनही कोसबाडच्या शाळेत चालू आहे.
अनेक उत्तम पुस्तकांचे लेखन, बालवाडी, पाळणाघरे, विकासवाडी, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र, डि.एड् काॅलेज, मुद्रणालय, बाल उद्योगालय अशा अनेक योजना अनुताईंनी सक्षमपणे सुरू केल्या व उत्तम प्रकारे चालवल्या. हे सर्व प्रकल्प हे त्यांनी कोसबाडला दिलेले वरदानच आहे.
अनुताईंचे वय वाढत होते तसा कामाचा उत्साह ही वाढत होता. कामात बदल म्हणजेच सुट्टी किंवा आनंद असे त्यांना वाटत असे.
एकामागे एक नवनवे प्रकल्प हातावेगळे करत त्यांचे काम जोमाने चालू होते. अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली , अनेक पुरस्कार मिळाले.
1972 ते 1992 या वीस वर्षांत त्यांना सरकारी, निमसरकारी, विविध संस्था यांजकडून एकुण 16 पुरस्कार मिळाले. अनेक ठीकाणी महत्वाची पदे भुषवली , अनेक मानांकने मिळवली.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोसबाड हेच त्यांचे कुटुंब होते. त्यांचे या व्यतिरिक्त वेगळे कौटुंबिक जीवन नव्हतेच.पत्ते खेळण्याची आवड त्यांच्या वडिलांकडून आली होती. ती त्यांची आवड शेवटपर्यंत टिकून होती. कॅनवेस्टा हा पत्यातला खेळ त्यांना अतिशय प्रिय होता. झोपण्यापूर्वी एक तरी डाव खेळल्या शिवाय त्या झोपत नसत.
स्वतःचे कुटुंब नव्हते पण भावा बहिणींच्या कुटुंबावर त्यांनी खुप माया केली , प्रेम दिले. पुण्याला भावाच्या घरी 3/4 दिवस राहून गेल्या की तो आनंद त्यांना दिर्घकाळ पुरत असे. अतिशय मोकळे व पुढारलेले विचार असल्यामुळे तरुण मंडळींनाही त्या बरोबरीच्या वाटायच्या.
एका लेखात त्यांची सगळी कारकिर्द लिहीणे खुप अवघड आहे. त्यामुळे थोडे महत्वाचे मुद्दे लिहीले आहेत.
27 सप्टेंबर 1992 साली अनुताईंनी अखेरचा श्वास घेतला. वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाले. आणि एका विलक्षण व्यक्तीमत्वाचा अस्त झाला.
© मीना घारपुरे


