गेल्या अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने लहान मुलांशी, वाढत्या वयातील मुलांशी गप्पा मारतीये. आपल्या सर्वांचा असा खूप मोठा गैरसमज होत चालला आहे की, या वयातील मुलांना अभ्यास ते करत असलेले वेगवेगळे क्लास याचाच काय तो ताण आहे. पण तसं नाहीये या मुलांच्या स्वतंत्र अस्तित्वाला आपण मोठ्यांनी काळजीच्या नावाखाली पूर्णतः संपवून टाकलं आहे. आपण त्यांना सदोष वाढवतोय आपल्याही नकळत. मान्य करा अगर नका करू पण हे सत्य आहे. हे चूक - हे बरोबर, हे योग्य - हे अयोग्य असं सगळं आपणच त्याला सांगून मोकळे होतो. मुलांची स्वतःहून शिकण्याची, समजून घेण्याची जी सर्वात मोठी ताकद आहे न ती तुम्ही आणि मी मिळून संपवतो. माझं बाळ चुकलंच नाही पाहिजे, त्याला त्रास व्हायलाच नको, त्याने गोंधळ घालूच नये, कुठे अडखळुच नये यासाठी त्याचे चुकांमधून शिकण्याचे, समजून घेण्याचे, अडखळून पुन्हा उभं राहण्याचे, सगळे मार्ग तुम्ही आणि मी बंद करत चाललो आहोत. असं वागलं की चांगलं म्हणतील, असं केलं तर लोकं वाईट म्हणतील. हे केलंस तुझं लोकं कौतुक करतील, तू खूप मोठा होशील, तू शहाणा म्हणून समजला जाशील असं बरच काही आपण आपल्या मुलांना कळत नकळत शिकवतोय, सांगतो.
कधी असा विचार केला आहे का? की, आपण आपल्या मुलांना त्यांच्या वयानुरूप वाढूच देत नाही. उगाचच त्यांना वेळेआधी मोठे करण्याच्या मागे लागलो आहोत. त्यांच्या वयानुसार त्यांना काही चुका माफ असं आपल्यातील किती पालक विचार करतात. तुम्ही मी त्या-त्या वयात केलेल्या चुकाच ही मुलं आता करत आहेत आपण कधी मान्य करायला शिकणार? एक छोटं उदाहरणं देते, मुलं खोटं का बोलतात ? याबाबत ताराबाईंनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय की लहान वयात मुलांना खरं-खोटं हा भेद कळत नाही. मार बसू नये, ओरडा बसू नये, म्हणून मुलं ती वेळ मारून नेण्यासाठी जे बोलतो ते खोटं. ही त्या वयातील खूप सहज प्रवृत्ती आहे. पण आपण त्याला तू खोटारडा आहेस असं म्हणतो, त्याच्यावर आरोप करतो आणि त्याला guilt मध्ये टाकतो. खरं सांगायचं तर ताराबाई म्हणतात की अनेकदा तर मूलं इतके लहान आहे की हे खरे हे खोटे हे त्याला कळतच नाही. त्याला फक्त तो चुकला किंवा त्याने काहीतरी चुकीचं केलं हे कोणाला कळू द्यायचं नाही ते लपवायचं आहे म्हणून तो त्या वयानुरूप जे करतो त्याला आपण खोटेपणाचं लेबल लावून मोकळे होतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की, मग मुलांना खरं- खोटं यातला फरक सांगायचा नाही का? तर सांगायचा पण ते सांगताना आपण वापरत असणारे शब्द, आपली देहबोली मुलांना चूक समजावून सांगणारी आणि काहीही झालं तरी तू माझंच बाळ आहेस, हे असं होऊच शकत असा विश्वास देणारी असायला हवी. खोटं बोलणे योग्य नाही हे शिकवताना ही फक्त आपल्या शब्दातून व्यक्त होत राहिली कृतीतून नाही तर मुलांना काय कळणार की नक्की काय करावं कसं वागावं? कारण अनेकदा आपणच मुलांसमोर खोटं बोलत असतो, नव्हे कधी कधी तर त्यांना आपल्या त्या खोट्या बोलण्याचा भाग बनवत असतो. ( बाबा नाही घरात असं सांग.... असं काहीही.... ) इतकंच नाही तर आपलं खोटं बोलणं हे कसं योग्य आणि गरजेचं म्हणून बोललं गेलेलं आहे हे पण त्यांना पटवून देतो. कधी असा विचार केला की आपण स्वतः च असं वागून आपल्या मुलांना confuse (संभ्रमात टाकतो) करतो. मला तर कायम असं वाटतं मुलं आपल्यापासून गोष्टी लपवू लागली की तो त्यांचा नाही आपला पराजय आहे, कारण तुम्ही किंवा मी त्यांच्यात तू मला काहीही सांगू शकतोस मी तुला समजून घेईन हा विश्वास द्यायला कमी पडलो. कधीकधी खरं सांगणं मुलांसाठी शक्य नसतं, इथे चूक-बरोबर असं काहीही नसून त्यांना ती गोष्ट सांगण्यासाठीची ताकद आणि वेळ दिला जाणं हे ही तितकाच महत्वाचं आहे हे आपण पालक म्हणून कधी समजून घेणार आहोत. असं काही झाल्यावर स्वतः च बालपण आठवलं, स्वतः च्या चुका आठवल्या तर कदाचित आपला त्यावेळी मुलांवर निघणारा निरर्थक त्रागा नक्की कमी होईल. इयत्ता ७ वी च्या इंग्रजी पुस्तकात double standard ( डबल सॅन्डर्ड ) नावाची कविता आहे. मला कायम वाटतं की कविता मुलांना नाही तर पालकांना, शिक्षकांना रादर मुलांशी संबंध येणाऱ्या प्रत्येक मोठ्या माणसाला शिकवली पाहिजे. नव्हे त्यांच्यात ती उठता-बसता रुजवली पाहिजे. त्या कवितेच्या काही ओळी मुलांच्या वेदना, त्याच्या मनातील भावनिक आंदोलने किती स्पष्ट मांडतात पहा ......
Double Standards