मॉटेसरींची शिक्षणपद्धती ही खूप खर्चाची आहे, कारण त्यामध्ये विशिष्ट प्रकारची साधन-सामग्रीची आवश्यकता असते. ही शिक्षणपद्धती जर मोठ्या प्रमाणावर आणि जास्त मुलांसाठी वापरायची तर त्यावर होणारा खर्च शक्य तितका कमी करणे आवश्यक होते. यावेळी ताराबाईंचे लक्ष ग्रामीण आणि आदिवासी भागाकडे गेले. त्यांनी या भागातील शिक्षणापासून वंचित मुलासाठी तेथे एक शिक्षण केंद्र स्थापन करायचे ठरवले. या नंतर अनेक अडचणींचा सामना करत, बर्य़ाच प्रयत्नांनंतर आणि अनेक धाडसी आणि नवी दिशा दाखवणारे जाणारे निर्णय घेत ‘कोसबाड’चा जन्म झाला. ताराबाई आणि त्यांच्याइतक्याच ध्येयवादी व या कार्याला समर्पित त्यांच्या सहकारी अनुताई वाघ यांच्या अथक परिश्रमाने आज नूतन बाल-शिक्षण संघ ही संस्था ‘पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाचे मार्गदर्शक’ म्हणून कार्यरत आहे. सध्या या संस्थेचे मुख्यालय ‘कोसबाड हिल, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. महाराष्ट्र.’ येथे आहे.
अनुताई ताराबाईंना भेटल्या तेव्हा ताराबाई नूतन बालशिक्षण संघाचा, आधी बोर्डी येथे व तेथून कोसबाडला विस्तार करायच्या प्रक्रियेमध्ये होत्या. अनुतांईंनी ताराबाई बरोबर काम करण्याची इच्छा दर्शवली. त्यानंतर त्यांनी दोघींनी जोडीने सर्वस्वी अनोळखी जीवन शैली असलेल्या भागात आदिवासी मुलांच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. आदिवासी मुलांनी शिक्षण घ्यावे ही या ध्येयवादी, निष्ठावान आणि दृढनिश्चयी दोघींसाठीच एक अभिनव आणि नवीन कल्पना नव्हती तर तिथल्या आदिवासींसाठी तर हे सर्व अकल्पितच व अशक्य असेच होते. पण त्यानंतरच्या काही वर्षात ताराबाई आणि अनुताई यांच्या अथक आणि निःस्वार्थी प्रयत्नांनी हे अशक्य शक्य करून दाखवले. त्या सर्वसाधारण्पणे वंचित समाजातील बहुसंख्य मुले शिक्षण घेऊ लागली. यासाठी कोसबाड्मध्ये अनुताईंनी अनेक नवे शैक्षणिक प्रयोग केले, आणि ते प्रत्यक्षात कार्यान्वित ही केले.