दि. १९ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी साभागृह, बालशिक्षण शाळा, मयूर कॉलनी, पुणे येथे झालेल्या समारंभात पद्मभूषण ताराबाई मोडक स्मृती पुरस्कार व पद्मश्री अनुताई वाघ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले
पद्मभूषण ताराबई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ स्मृती पुरस्कार प्रदान
ऋषितुल्य श्री. वामन नारायण अभ्यंकर, व संस्कृती संवर्धन मंडळ, शारदानगर, सगरोळी, यांना बुधवार दि. १९ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी साभागृह, बालशिक्षण शाळा, मयूर कॉलनी, पुणे येथे झालेल्या समारंभात पद्मभूषण ताराबाई मोडक स्मृती पुरस्कार व पद्मश्री अनुताई वाघ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कार कोसबाड येथील नूतन बाल शिक्षण संघाच्या वतीने देण्यात आले. ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी डहाणू व कोसबाड क्षेत्रात ग्रामीण व आदिवासी भागात प्राथमिक व पूर्वप्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मूलभूत कार्य केलेले आहे. स्थानिक लोकांच्या गरजा ओळखून, नवीन संकल्पना राबवून शिक्षण प्रणाली सुरू केली. बालवाडी,अंगणवाडी, कुरणशाळा, या त्यांच्या संकल्पना आता केंद्रसरकारने आपल्या शिक्षण प्रणालीत सामावून घेतल्या आहेत. त्यांच्या या मौलिक कार्याची ओळख सर्वदूर व्हावी तसेच असे काम इतरत्र करणार्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, हा या गौरव पुरस्कारांचा उद्देश आहे. पुरस्काराचे स्वरूप, रु.२५०००/- व मानपत्र असे आहे. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत श्री विजय कुवळेकर व मॉडेर्न महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री अ.गो.गोसावी यांनी निवडसमितीचे काम पाहिले.
श्री अभ्यंकर यांनी निगडी प्राधिकरण येथे गेली ५० वर्षे शिक्षण क्षेत्रात अथक प्रयत्न करून उत्तमोत्तम विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते, अधिकारी निर्माण करून फ़ार मोठे योगदान दिले आहे.
. ‘ग्रामीण भागातील समाजाला शिक्षित, सुसंस्कृत, सजग अणि संपन्न बनवणे या उद्देशाने संस्कृती संवर्धन मंडल, सगरोळी ही संस्था सर्वांगीण शिक्षणासाठी कार्य करते. संस्थेचा शिक्षणाप्रती असलेला विधायक दृष्टिकोन विद्यर्थ्यांना परिपूर्णतेकडे नेण्यास उपयुक्त ठरला आहे. महत्वाचे म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांनी मुलींसाठी वसतीगृह सुरू करून सोडविला आहे.
समारंभाला मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध शिक्षणतज्ञ मीना चंदावरकर व रुईया कॉलेजच्या माजी मराठी विभाग प्रमुख मीना गोखले लाभले होते.
समारंभाचे सूत्रसंचालन गंधाली दिवेकर यांनी केले. अरुणा एरंडे यांनी प्रस्तावनेमध्ये नूतन बाल शिक्षण संघ, व पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ यांची थोडक्यात माहिती सांगितली व पुरस्कार सुरू करण्यामागचे प्रयोजन सांगितले. श्री पावसकर,यांनी कोसबाड येथील प्रायोजित नवीन प्रकल्पांची माहिती दिली. श्री दिनेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
श्री. अभ्यंकर यांनी त्यांच्या उत्तराच्या भाषणात सांगितले की आपल्या पंचेंद्रियांचाविकास करून त्याद्वारे आत्मविकास व समाजविकास साधावा. तसेच शिक्षण व शिक्षणपद्धतीने रूढींमध्ये अडकून न राहता काळानुरूप नवीन संकल्पना व पद्धती स्वीकारून प्रगती केली पाहिजे.
संस्कृती संवर्धन मंडाळाचे अध्यक्ष श्री. देशमुख यांनी त्याच्या उत्तराच्या भाषणात नांदेड भागातील शिक्षणात येणार्या अडचणी व त्यावर त्यांनी केलेले उपाय विषद केले. तसेच मुलींच्या शिक्षणाची सोय म्हणून त्यांच्या संस्थेने वसतीगृह सुरू केल्याचे सांगितले. शिक्षणाच्या नवीन संकल्पना वापरत आवश्यकतेनुसार आता सगरोळी येथे शिक्षणाचे शिस्तबद्ध संकुल उभे आहे. शिक्षणाबरोबरच आजूबाजूच्या भागाचाही विकास होत आहे असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
डॉ. मीना गोखले यांनी सांगितले की शिक्षणाचे माध्यम कुठलेही असले तरी शिक्षणाची आपल्या संस्कृतीशी सांगड घालणे आवश्यक आहे.
मीनाताई चंदावरकर यांनी उत्तम शिक्षक कसा असावा याचे विष्लेषण केले. शिक्षक हा शरीर-विचार-भावना या सर्वांनी बालकेंद्रित असावा. व्यवसायनिष्ठ असावा, त्याच्यात सहिष्णुता असवी, नेतृत्व गुण असावेत. शिक्षण हा त्याचा व्यवसाय न राहता त्याची जीवनवृत्ती असावी. मुलांसाठी शिक्षक हा सर्वतोपरी आदर्श असावा.